18 May
आम्ही सोळा नंबरच्या बसने राजवाड्याला जायचे ठरवले. बराच वेळ आम्हाला सोळा नंबरचा बस स्टॉप सापडेना. मग आम्ही एका पोलीसला विचारले. आम्ही bus stopवर पोचलो. आमच्याबरोबर एक निग्रो मुलगीपण होती. तिने तीन दिवसांची टूर बुक केली होती. त्यामुळे तिचा टूरचा ग्रुप दिसल्यावर ती राजवाड्याच्या आधीच उतरली. राजवाड्यात आल्यावर आम्ही उतरलो तिथे बुकिंग ऑफिस होते. आतमध्ये गेल्यावर चौकशी केल्यावर कळले की राजवाडा, आर्ट गॅलरी व म्युझियम या सर्वांचे मिळून प्रत्येकी 4000 forint (10 euro) तिकीट होते!

इतके पैसे देऊन आर्ट गॅलरी आणि म्युझियम बघण्यात आम्हाला दोघींना मुळीच रुची नव्हती. तसेच तिकीट न काढता देखील फिरण्यासारखे-बघण्यासारखे बरेच होते. आपल्याकडे कसे प्रत्येक गावाला गावदेवीचे देऊळ असते तसे इथे देवीचा (Guardian angel) मोठा पुतळा राजवाड्याच्या शेवटच्या टोकावर उभा आहे. दहा-बारा फूट उंचीचा पुतळा असून तिच्या हातात एक बाळ आहे. तिचे तोंड बाहेरच्या बाजूला असून ती देवी तिथून पूर्ण शहरावर लक्ष ठेवते असा समज आहे. तिथे अनेक योद्ध्यांचे पुतळे आहेत. तसेच एक मोठा पंख पसरलेल्या गरुडाचा पुतळा आहे. तो गरुडाचा पुतळा कधीही आकाशात झेप घेईल इतका जिवंत वाटत होता.




मग तिथुन आम्ही बाहेर पडलो. फिरत-फिरत आम्ही Fisherman bastion या ठिकाणी आलो. तिथे एक मोठे व खूप कलरफुल असे चर्च आहे. मितालीने तिकडे Fisherman bastionचे तिकीट काढले. हजार फोरिंत प्रत्येकी. इथे वेगवेगळ्या आकाराचे व नक्षीकामाचे ऑब्झर्वेशन पॉईंट्स आहेत. तिथे आम्ही खूप फोटो काढले. तसेच इतर कोणाला सांगून आमच्या दोघींचे बरेच फोटो काढून घेतले.





तिथून निघाल्यावर आम्ही बसने कॅण्डी स्टोरच्या स्टॉपला उतरलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅंडीज घेतल्या. souvenir शॉपमध्ये हजार forintsला एक मॅग्नेट विकत होते. मग शेवटी एका souvenirsच्या दुकानात मात्र तिथली आठवण म्हणून एक-दोन मॅग्नेट घेतले आणि मग बस घेऊन langos खायला जायचे ठरवले. इथे प्रत्येक बसमध्ये कंडक्टर नसतो. त्याऐवजी बटण असते- तुम्ही बसमध्ये चढताना ड्रायव्हरला तुमच्याकडे तिकीट दाखवायचे किंवा तिकीट नसेल तर तिथे तिकीट वेंडिंग मशीन असते. स्टॉपचे बटन दाबले तरच ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि मगच दरवाजे उघडतात. Langosच्या हॉटेलचा स्टॉप आल्यावर मितालीने स्टॉप बटन दाबले पण ते नीट दाबले गेले नसावे व दुसरे कोणी उतरणारे नसल्याने बस थांबलीच नाही. पुढचा बस स्टॉप जवळ जवळ सात-आठ मिनिटानंतर होता. पुढच्या stopला उतरल्यावर परत विरुद्ध दिशेची बस पकडून आम्ही मागे आलो.

आज आम्ही दुसर्या प्रकारचा व्हेज langos खाल्ला. तिथून हॉस्टेल चालत पाच मिनिटावर होते. रूमवर येऊन दुसऱ्या दिवशीची तयारी केली आणि झोपलो. आमची फ्लाईट सकाळी सात वाजताची असल्याने आम्हाला पहाटे चार वाजता रूम सोडायची होती. सो…. गुड नाईट.








Leave a Reply