10 May

सकाळी उठून आम्ही ब्रेड-बटर, cupcakes आणि कॉफी असा नाश्ता केला. त्यानंतर बसने आम्ही अंडरग्राउंड बस स्टेशनला गेले. आमची बस 11 वाजताची होती. आम्हाला बसमध्ये बसायला व्यवस्थित जागा मिळाली. दुपार होत आली असल्याने बाहेर चांगलेच तापले होते. जरा स्थिरस्थावर झाल्यावर मितालीने ड्रायव्हरला जाऊन विचारले की यानंतरची साडेबाराची पुढची बस आहे ती आम्हाला मिळेल का? त्यावर ड्रायव्हरने सांगितले की- हो, नक्कीच मिळेल! बरोबर 12:30ला बस स्टॉप वर उतरलो तर तिथे आमची पुढची बस उभीच होती. आम्हाला खूप आनंद झाला! अत्यंत खुषीत बसमध्ये चढणार तेवढ्यात बस ड्रायव्हरने सांगितले की ती बस ज्या मार्गाने जाते त्या मार्गावर अपघात झाल्यामुळे ही 12:30ची बस रद्द केली आहे. साधारण अर्ध्या-पाऊण तासात तो रस्ता clear होईल; पुढची बस 1:25ला आहे.

आमच्यासारखे अजून चार-पाच जण होते त्यांना पण लाईट हाऊसला जायचं होतं. त्यातील एक Swedish तरुण आणि एक जर्मन जोडपे होते. लगेचच आमचा ग्रुप झाला. मितालीला जर्मन भाषा व्यवस्थित येत असल्याने संवाद सुरू व्हायला अडचण नव्हती. त्याप्रमाणे असे ठरले की 1:25ची बस आली नाही तर 1:55च्या बसने सर्वजण परत मूळ ठिकाणी जाऊ. आणि मितालीने ठरवले की आपण समुद्रकिनाऱ्यावर जाऊ. उन्हात बसण्यापेक्षा आम्ही विचार केला की आसपास cafe असला तर तिथे बसू. पण आम्हाला cafe काही मिळाला नाही. मग जास्त वेळ न घालवता आम्ही दोघे बस स्टॉपवर सावली शोधून बसलो. बरोबर खायला आणलेल्या गोष्टी खाल्ल्या आणि पाणी प्यायलो. तोपर्यंत बाकी तिघे जण परत आले. बरोबर 1:25ला बस आली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला! उशिरा का होईना पण आम्ही लाईट हाऊसला पोचू! बस सुरू झाली. बस ज्या रस्त्याने जात होती तो रस्ता अगदी कठीण वळणांचा होता. आपल्याकडच्या आंबोळी घाटासारखा! अतिशय तीव्र वळणे आणि अरुंद रस्ता. म्हणजे जर समोरून गाडी आली तर एका वेळी दोन buses कशाबशा cross करायच्या. काही ठिकाणी खूप अरुंद भागात समोरून येणारी गाडी रिव्हर्स घेऊन मागे जायची. त्याच रस्त्यावरून cars आणि सायकलस्वार पण ये-जा करत होते.






आमचा बस ड्रायव्हर अतिशय कुशल होता. अर्थात कुशल ड्रायव्हिंग ही तिथली बेसिक मागणी असणार. नाहीतर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एका बाजूला डोंगरकडा व दुसऱ्या बाजूला खोल दरी. या डोंगराची उंची समुद्र सपाटीपासून तीनशे मीटर होती आणि एकूण प्रवास तीन किलोमीटर इतका होता. आम्ही पाच जण बसमध्ये जवळपासच बसलो होतो. शेवटचा स्टॉप यायच्या आधी एक स्टॉप अलीकडे जवळपास सर्व बस रिकामी झाली. तो swedish तरुण देखील झपाट्याने उतरून गेला. मग आम्ही पण उतरणार तेवढ्यात त्या जर्मन मुलीने ड्रायव्हरला विचारले की हा स्टॉप शेवटचा आहे का? त्यावर ड्रायव्हरने सांगितले, शेवटच्या स्टॉपला अजून दहा मिनिटं तरी लागतील. या गडबडीत तो swedish तरुण बराच पुढे गेला. आम्हाला वाटले तो चुकून उतरला बहुतेक. म्हणून आम्ही त्याला खिडकीतून, “अजून एक stop आहे पुढे” अशा अर्थी हात केला पण त्याला वाटले की आम्ही त्याला बाय-बाय करतोय म्हणून त्यानेसुद्धा आम्हाला त्याप्रमाणे हात दाखवला. आम्ही बसने अजून वर गेलो. आम्हाला वाटले की बस आता लाईट हाऊसच्या अगदी जवळ जाणार. पण तिथे उतरल्यावर कळलं की बस एका ठराविक अंतरावर थांबते. तिथून पुढचा पंधरा-वीस मिनिटांचा hikingचा रस्ता आहे. आम्हाला याची कल्पना नसल्यामुळे मिताली नेमक्या चपला घालून आली होती. त्यामुळे आम्ही ठरवले आलो त्याच बसने परत जायचं आणि लगेचच्या viewpointला उतरायचं. ते जर्मन जोडपे त्या पॉईंटवरून पुढे हायकिंगला गेले. कदाचित त्यांना कल्पना नसेल hikingची पण ते पूर्ण तयारीत असल्याने ते पुढे गेले. बस निघण्याच्या तयारीत होती. आम्ही बसचे पुढच्या स्टॉपचे तिकीट घेऊन लगेच उतरलो.

आणि उतरल्यावर आ वासून बघतच राहिलो! नजरेच्या टप्प्यात मावणार नाही एवढा अथांग समुद्र. समुद्राचे नाव Balearic Sea (बेलियारिक सी). एरवी समुद्र जवळ असला की लाटांची गाज ऐकू येते. पण हा समुद्र खूप शांत होता, जणू काही विराट तलाव. आजूबाजूला हिरव्या छटांचे डोंगरकडे. समुद्राचे पाणी तर काही काही ठिकाणी Zugspitzeला जी Lake Eibsee होती त्याच्या पाण्यासारखे. हिरवा, निळा, मोरपंखी अशा रंगांचे पट्टे पाण्यात दिसत होते. त्या दृष्यावरून नजर वळवावीशी वाटत नव्हती. अगदी डोळे भरून तो परिसर पाहिला. कारण जे पाहिले त्यासाठी कॅमेराची तेवढी कुवतच नव्हती. अर्थात High-end कॅमेरा कदाचित ते दृश्य ताकदीने टिपू शकेल. तेवढ्यात आम्हाला तो swedish तरुण दिसला. त्याचे नाव Aseer. मी तेवढ्यात त्याला विचारून टाकले की तू चुकून येथे उतरल्यास का? तुला बस पुढे जाणार हे माहिती होते का? त्यावर तो उत्तरला, “नाही, चुकून नाही उतरलो. मला hiking करायचे नव्हते. माझ्या मित्रांनी मला हा पॉईंट सुचवला होता”. मग त्याने आम्हाला विचारले की, तुम्ही पुढे गेला नाहीत का? त्यावर आम्ही आमचा झालेला गैरसमज त्याला सांगितला. मग नंतर तो आमच्या बरोबरच होता. आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. मग त्याने मितालीच्या मोबाईलवरून आमचे बरेच फोटो काढले.मितालीने पण त्याच्या कॅमेर्याने त्याचे बरेच फोटो काढले. शेवटी आम्ही त्याच्याबरोबर सेल्फी घेतला. मितालीने काढलेले फोटो बघून त्याने तिच्या फोटो काढण्याच्या कलात्मक नजरचे खूप कौतुक केले. मग मितालीने परतीच्या बसची वेळ बघितली. पंधरा मिनिटं होती बस यायला. आम्ही बसची जिथे वाट पाहत होतो तिथे कुठेच आडोसा नव्हता. तापमान साधारण 27-28 डिग्री असावे पण ऊन इतके कडक आणि टोचणारे होते; जणू काही 35 डिग्री इतके! शेवटी बस आली.








Leave a Reply