अगदी बरे झाले आम्ही रात्रीच आंघोळ केली ते. सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होस्टेलला पाण्याचा थेंब नव्हता. त्यामुळे आठ वाजता पाणी आल्यावर आम्ही ब्रश केला व ब्रेकफास्टसाठी गेलो. आता होस्टेलच्या ब्रेकफास्ट विषयी थोडेसे. बहुतेक ठिकाणी 9 ते 11 किचन ओट्यावर सर्व ब्रेकफास्ट मांडून ठेवलेले असते. ब्रेड, बटर, कप केक, कॉफीच्या बाटल्या, कॉफी मेकिंग मशीन, उकडलेली अंडी, दोन-तीन प्रकारचे ज्यूस, कॉर्नफ्लेक्स यातील थोड्याफार फरकाने कमी-जास्त असतेच असते. दुधाच्या बाटल्या सुद्धा असतात. यामध्ये काही ठिकाणी सोयामिल्क पण असते, Vegan लोकांसाठी.
बरोबरीने मायक्रोवेव्ह, ओव्हन वगैरे असते. तुम्ही तुम्हाला पाहिजे ते पार्सल करून बरोबर पण घेऊ शकता. त्याप्रमाणे आम्ही ब्रेड-बटर, जॅम आणि केक याबरोबर कॉफीपण घेतली. तसेच ब्रेड बटर सँडविच पार्सल बरोबर घेतले. आज रेगुलरच्या ऐवजी दोन्ही बाटल्या सोयामिल्कच्या होत्या. आम्ही सोयामिल्कची कॉफी पहिल्यांदाच घेतली. पण दोघींना सुद्धा त्याची चव अजिबात आवडली नाही. साडेनऊला निघून बसने आम्ही अंडरग्राउंड स्टेशनला आलो. आमची बस दहा वाजताची होती. बस मध्ये नीट जागा मिळाली. आम्ही बरोबर अकरा वाजता scuba diving centerला पोचलो.

स्कुबा डायविंग सेंटर बस स्टॉपच्या जवळ होते. गेल्या गेल्या एका काळ्याकुट्ट अल्सेशियन कुत्र्याने आमचे स्वागत केले. पण भुंकून नाही तर हुंगून! खूपच प्रेमळ कुत्रा होता तो, very फ्रेंडली! नंतर समजले की त्याचे नाव Nano आहे. मग Elsa, म्हणजे आमची ट्रेनर, पुढे आली. सोनेरी केसाची आणि लहान चणीची- चवळीच्या शेंगासारखी. अर्थात तिची शरीरयष्टी ही तिच्या नोकरीची देणगी होती तिला. तिचे वय पस्तीस पर्यंत असावे. तिने आमची ओळख मायकल व सेबास्टियन यांच्याशी करून दिली. मायकल हा तिथला owner असून ताठ कण्याचा आणि उंचपुरा आहे. पंच्याहत्तरीच्या आसपास असावा. सहा फुटाच्या वर उंची. या वयात देखील तो दिवसातून चार वेळा स्कुबा ड्रायविंग करतो. सेबास्टियन हा जवळपास मितालीच्या वयाचा तरुण. तो रियल इस्टेटचे काम करतो. त्याचे आई, वडील आणि बहीण सर्वजण उत्कृष्ट divers आहेत. सेबास्टियन वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्कुबा ड्रायविंग करतो आहे. मायकल, सेबास्टियन आणि Elsa खोल समुद्रात 45 मीटर पर्यंत जाऊ शकतात. असो. सर्वप्रथम Elsaने आमच्याकडून फॉर्म भरून घेतला. त्यात तुम्हाला काही आजार आहेत का अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न होते.
Elsaकडे जाड पुठ्याचा पेपर chart होता. त्यावर चित्राच्या सहाय्याने तिने आम्हाला पाण्याच्या खाली गेल्यावर श्वास कसा घ्यायचा, गॉगलमध्ये पाणी गेल्यास ते पाण्याच्या खाली राहूनच कसे बाहेर काढायचे हे सर्व शिकवले. तसेच पाण्याच्या खाली गेल्यावर बोलता येणार नाही म्हणून खुणेची भाषा शिकवली. हे पुस्तकी ज्ञान झाल्यावर तिने आम्हाला आमच्या मापाचा वेट्सुट दिला व चेंजिंग रूममध्ये जाऊन घालून यायला सांगितले. ते ट्रेनिंग सेंटर म्हणजे एक मोठे आवार होते जे कुंपणाने बंदिस्त केले होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चार-पाच मोठ्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये पाणी भरून ठेवले होते. आवाराच्या आत शिरल्यावर बसण्यासाठी बाक आणि एक मोठे टेबल होते. जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक शेड होती. तिथे किचन ओटा होता. त्या ओट्यावर मायक्रोवेव, कॉफी बनवण्याचे मशीन आणि इंडक्शन stove होता. बाजूच्या एका कपाटात स्टोरेज होते, भांड्यांसाठी. डाव्या हाताला गेल्यावर एका खोलीत भिंतीवर मोठा चार्ट अडकवला होता. त्यावर समुद्रामधले डायव्हिंग spots दाखवले होते. ही खोली जरा छोटी होती. पुढची खोली चांगलीच प्रशस्त होती. त्या खोलीत दोन कपडे बदलण्याच्या खोल्या, दोन बाथरूम आणि दोन टॉयलेट्स असून एक मोठा आरसा व बेसिन होते.
त्या वेट्सुटकडे बघितल्यावरच मी मितालीला सांगितले की हा सुट चढवायला मला तुझी मदत लागेल. कारण वेट्सुट अखंड असतो, पायापासून गळ्यापर्यंत. अतिशय घट्ट. घट्ट यासाठी की आतमध्ये पाणी जाऊ नये. मितालीच्या मदतीने मी वेट्सुट अक्षरशः चढवला. मग आम्ही बाहेर आवारात आलो. मग तसेच बूट दिले आणि गॉगल दिला. हे सर्व झाल्यावर एक सिलेंडर हवेने भरलेला, त्याला तीन पाईप्स आणि बटण होते आणि सिलेंडरला बांधण्यासाठी पट्टे- असा हा एक सेट होता. या सर्वांचे वजन 20-22 किलो सहज असेल. मग त्याने अगदी सहज ते सिलेंडर्स आमच्या पाठीला बांधले. त्या attached पाईपsची माहिती दिली. पाईपच्या एका बटणाने सिलेंडर मधील हवा आत घ्यायची, दुसरे बटन जॅकेटमध्ये हवा भरण्यासाठी. हे जॅकेट सिलेंडरला जोडलेले होते. हवा काढण्यासाठी एक पाईप होता आणि एक पाईप जास्तीचा, बॅकअपसाठी होता. जर पहिला पाईप काम करेनासा झाला तर backup पाईप वापरायचा.
ते सर्व वजन घेऊन आम्ही रोड क्रॉस केला. लगेच खाली उतरण्यासाठी दहा ते बारा दगडी पायऱ्या होत्या. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समुद्रकिनारा होता. मला आता आश्चर्य वाटते की कसे काय हे सर्व मी झेपावले! एरवी मला कोणीच वजन उचलू देत नाही, कारण मला गेल्या 15-16 वर्षापासून lower back painचा त्रास आहे. पण back of the mind हे होते की मितालीने इतके पैसे भरले आहेत आपल्यासाठी, तर आता माघार नाही! या निर्धाराने मी सर्व करत होते. इतके वजन उचलून मी त्या पायऱ्या एकटी उतरले! काही पावले वाळूतून चालल्यावर लगेच आम्ही उथळ पाण्यात शिरलो. आम्ही दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरला होता. साधारण पाच फुटापर्यंत गेलो असू, कारण आमचे पाय टेकत होते आणि पाणी अगदी गळ्याच्या थोडे वरती पण डोळ्यांपर्यंत नव्हते. आम्ही पाण्यात शिरल्याबरोबर इतका वेळ जे सर्व जड-जड लागत होते त्याचे वजन जाणवेनासे झाले. मग तिथे आम्ही तिघेही एकमेकींचे हात पकडून गुडघ्यावर बसलो. मग आम्हाला आधी theory शिकवली होती तेच सर्व प्रात्यक्षिक करून घेतले. साधारण अर्धा ते पाऊण तास आम्ही पाण्यात होतो. मधून मधून उभे राहून Elsa, आमचे जे चुकते आहे ते सांगत होती. मग आम्ही पाण्याबाहेर आलो. मग मात्र माझा सिलेंडरचा पूर्ण सेट काढून दुसरा एक माणूस होता, (त्याचे नाव मीका) त्याच्याकडे दिला. आम्ही पायऱ्या चढून सेंटरमध्ये आलो. मग Elsaने आम्हाला जेवणासाठी अर्धा तास दिला व 1:25ला परत यायला सांगितले. कारण दीड वाजता आम्हाला खोल पाण्यात जाण्यासाठी स्पीडबोटवर जायचे होते.
Elsaने आम्हाला कपडे बदलून जेवण्याचा ऑप्शन दिला, पण ते शक्यच नव्हते. एक तर इतका घट्ट सूट आणि आता तर तो ओला पण झाला होता. त्यामुळे तो काढणे आणि परत चढवणे खूपच जिकरीचे होते. मितालीने suit तसाच ठेवला पण मी मात्र हात काढून वरचा portion कमरेशी बांधला आणि वरून टी शर्टs घातले. मग आम्ही हात-तोंड स्वच्छ धुऊन बरोबर आणलेले सँडविचेस खाल्ले, पाणी प्यायलो. जेवण झाल्यावर मितालीच्या साह्याने मी वेट्सुट चढवला. बूट काढले होते ते घातले. यावेळी आम्हाला स्पीड बोटी पर्यंत चालत जायचे होते. साधारण दहा मिनिटं तरी चालावे लागणार होते. मला माझ्या वयामुळे सूट मिळाली. मला सांगितले की तुम्हाला बोटीमध्ये सिलेंडर बांधू. मितालीने सिलेंडर जेवणाच्या वेळी काढला होता तो मात्र तिला परत बांधला व माझा सिलेंडर मीका घेऊन आला. यावेळी आमच्याबरोबर मायकल व सेबस्तियन दोघेही आले होते. आम्ही दोघींनी पाण्यात dive केल्यावर ते दोघे 45 मीटर खोल पाण्यात जाणार होते.
आम्ही स्पीड बोटीच्या धक्क्यावर आलो. सगळे बोटीत चढल्यावर बोटीने वेग घेतला. साधारण सात-आठ मिनिटात आम्ही भर समुद्रात पोचलो. तिथे पोचल्यावर मायकलने समुद्रात नांगर टाकला आणि स्पीड बोटीचे इंजिन बंद करून बोट समुद्रात तरंगत ठेवली. स्पीड बोटीचा कठडा रबरी होता. त्यावर तुम्ही बसू शकता. बोटीवर मध्ये एका standला काही सिलेंडरचे जॅकेट-सहित सेटs होते. तसेच पाण्यात पोहताना घालायचे fins होते. ते पाण्यात घातल्यावर सॅंडलसारखा बेल्ट ऍडजस्ट करून लावायचा. Fins हे साधारण दीड-एक फूट लांबीचे असावेत. ते रबरी असतात व बुटासकट त्यात पाय घालून बेल्ट लावायचा असतो. त्यामुळे पाण्यात पोहायला सोपे जात असावे. स्कुबा डायविंग करताना पाठीवर सिलेंडर बांधले की बोटीच्या कठड्यावर समुद्राकडे पाठ करून बसायचे व पाठीवर पाण्यात पडायचं (Back dive).
माझा सिलेंडर बांधायचा राहिला होता त्यामुळे मी कठड्यावर न बसता खाली पायरीसारखे होते त्यावर बसले. माझ्या पाठीला सिलेंडर बांधले, पायात fins पक्के फिक्स केले आणि आता मला बोटीच्या कठड्यावर बसायचं होते. मला प्रचंड दडपण आले होते. मला त्या पायरीवरून उठताच येईना! बरं, ती पायरी खूप लहान होती असे पण नाही. साधारण खुर्चीवर बसतो तेवढी उंची असेल जमतेम. पण मला अजिबात हलता येईना. जणूकाही शरीराने बंड पुकारले होते. माझी ती अवस्था बघून Elsaने माझं सिलेंडर पाठीवरून उतरवले व पाण्यात सेबास्टियनकडे फेकले आणि म्हणाली- “ठीक आहे, तुम्ही पाण्यात उडी मारल्यावर मायकल आणि सेबास्टियन तुम्हाला पाण्यात सिलेंडर बांधतील. त्यामुळे तुम्ही तुमचे पाय समुद्राच्या दिशेकडे टाका आणि सरळ पाण्यात उडी टाका. काळजी करू नका. मायकल आणि सेबास्टियन पाण्यातच आहेत. ते तुमच्या पाठीला सिलेंडर बांधतील. पाण्यात उडी मारल्यावर न घाबरता पाय मारत राहा.” मला पाठीवर पाण्यात पडायची भीती वाटत होती पण नुसती उडी मारायचे म्हटल्यावर माझ्या मनावरचा ताण जरा कमी झाला व मी बिनधास्त पाण्यात उडी मारली. तोपर्यंत सर्व ठीक होते. उडी मारताना खूप भारी वाटत होते, कारण मला समुद्र आणि उडी म्हटल्यावर वीर सावरकर आणि मार्सेलिस बंदरातली त्यांची जगप्रसिद्ध उडी आठवली. अर्थात वीर सावरकरांबरोबर तुलना करण्याचा हेतू मुळीच नाही; तर समुद्र, उडी आणि वीर, देशभक्त सावरकर हे समीकरण मनात होते.
असो. मी उडी तर व्यवस्थित मारली आणि हातपाय मारत तरंगत राहिले, साधारण 1-2 मिनिटासाठी. मग मायकल आणि सेबास्टियन यांनी ते अवजड सिलेंडर पाठीला बांधले. आधी जॅकेट घालावे लागते आणि मग सिलेंडरचा पट्टा टाइट बांधावा लागतो. त्यांनी तर सिलेंडर बांधले मात्र माझ्या नाकातोंडात आणि डोळ्यात पाणी गेले आणि मी गटांगळ्या खाऊ लागले. Elsaने शिकवलेली टेक्निक्स जणू पाण्याबरोबर धुवुन गेली. काहीच सुचेना. असे वाटले आता मी नक्की बुडणार. माझी अगदी बोबडी वळली होती. मात्र साईन लँग्वेज लक्षात होती. त्याप्रमाणे मी “प्रॉब्लेम” अशी खूण केली. या सर्वांमध्ये एखादा मिनिट गेला असेल. मात्र एवढे नक्की की मायकल आणि सेबास्टियन दोघांना माझा मेसेज लगेच समजला! मग त्या दोघांनी माझा लाइफ जॅकेटचा बेल्ट काढून सिलेंडर एल्साकडे दिले. Elsa तोपर्यंत बोटीतच होती. माझ्या पायातले fins काढून ते पण Elsaला दिले. मग सेबास्टियनच्या आधाराने पोहत पोहत मी बोटीचा जिना चढून बोटीत आले. बोटीत आल्यावर मला खूप वाईट वाटत होते की मितालीने एवढे पैसे खर्च केले त्याचा योग्य रीतीने उपयोग झाला नाही. मी वर आल्यावर Elsaने मितालीला back dive मारण्यास सांगितले. तिच्यापाठोपाठ Elsaने पण back dive मारली.
आता पुढील सर्व वर्णन मितालीच्या शब्दात- “मी पाण्यात back dive मारली तेव्हाच माझ्या पायातले fins निघाले असावेत. पण मला ते कळलेच नाही. जेव्हा Elsaने मला खुणेने विचारले- तुझे fins कुठे आहेत? तेव्हा मला कळले की आपल्या पायात fins नाहीत. मग Elsaने बोटीवरून दुसरा finsचा सेट मागवून माझ्या पायात फिक्स केला. एक तर आईची स्थिती पाहिल्याने माझ्या मनावर थोडे प्रेशर होते. पाईपमध्ये आणि जॅकेटमध्ये हवा भरलेली असल्याने मी तरंगत होते. मला खाली जाता येत नव्हते. तसेच मी सतत आडवी होत असल्याने बोटीच्या दोरीमध्ये माझे fins अडकत होते. अशारितीने पाण्यात पडल्यावर चार-पाच मिनिटं स्वतःला ॲडजस्ट करण्यात गेली. त्या मधल्या काळात Elsa आणि इतर दोघेजण माझे fins शोधत होते. Elsa खूप खोलपर्यंत जाऊन आली व येताना तिला बोटीच्या तळाशी अडकलेले fins दिसले. मग ते fins वरती बोटीत ठेवून तिने तिचा मोर्चा माझ्याकडे वळवला. प्रथम तिने माझ्याकडून पाण्यातल्या breathing exercises करून घेतल्या. Elsa पाण्यात मस्त आणि सहज vertical, stable उभी होती आणि मला stable उभे राहायला खूप कष्ट होत होते. मी सारखी आडवी होत होते. मग Elsaने दुसरे बटन दाबून सिलेंडर व जॅकेट मधली हवा काढून टाकली व माझ्या हातात तिने बोटीची दोरी दिली. त्या दोरीला पकडून मी खाली खाली जाऊ लागले. साधारण दोन-तीन फूट खाली गेले असेल जेमतेम तेवढ्यात माझ्या गॉगलमध्ये पाणी गेले आणि पाईपचा जो भाग तोंडात पकडून श्वास घ्यायचा असतो तो पण तोंडातून निसटला. त्यामुळे तोंडात देखील पाणी जायला लागले. Elsaने शिकवलेल्या techniquesचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण जमतच नव्हते. गॉगलमधले पाणी काढायचा प्रयत्न केला तर अजून पाणी नाकात जायला लागले. मग मी Elsaला खुणेने सांगितले की आता बस! मला वरती बोटीवर जायचे आहे! अशा रीतीने आमचा स्कुबा डायविंगचा अध्याय संपला. वरती आल्यावर बघते तर काय आई पाण्यात पोहत होती!”

आता परत back to me. मितालीने पाण्यात न घाबरता back dive मारल्यावर एकदम छान वाटले मला. त्या अथांग समुद्राकडे बघत असताना मनात विचार आला- एवढ्या खोल समुद्रात आपण परत कधी येणार? शक्यच नाही परत येणे! आपली झेप फक्त स्विमिंग टॅंक पर्यंत. मग मी तिथला एक float बांधून चक्क पाण्यात उतरले आणि बोटीच्या आसपास हात पाय मारले. बोट हाताच्या अंतरावर राहिल एवढ्याच अंतरावर राहिले सतत. कधीही दम लागल्यासारखे वाटले तर पटकन बोटीच्या दोरीला पकडू शकेन ही खात्री ठेवूनच. नाही म्हटले तरी इतक्या खोल पाण्याचा ताण मनावर होता. पाठीवर पण तरंगले.. किती छान वाटत होते! तेवढ्यात मला मिताली व Elsa दोघीही बोटीवर चढतांना दिसल्या. मग मला राहवेना. असे काय झाले की मिताली इतक्या लगेच वरती आली? मग मी पण बोटीवर चढले आणि पाहते तो काय! मितालीच्या अंगठ्याला काहीतरी लागल्याने रक्त येत होते. Elsaने तिला band-aid लावले. मग आम्ही बोटीवरच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात मायकेल आणि Sebastian दोघेही बोटीवर आले. वरती आल्यावर बोटीचा नांगर unlock करून तो वरती घेतला. स्पिडबोट वेगाने सेंटरच्या समोरच्या भागात पोचली. परत आम्ही सर्वांनी उथळ पाण्यात उड्या मारल्या. दगडी पायर्या चढून आणि रोड क्रॉस करून सेंटर मध्ये पोचलो.

या सेंटरची राखण Nano करत होता. मायकल ने सांगितले की जेव्हा आम्ही कोणीच सेंटरवर नसतो तेव्हा Nano राखण करण्यासाठी इथेच थांबतो. तो दरवाज्याशी (फाटकाशी) एकदम attention मध्ये बसलेला असतो. सेंटर मध्ये गेल्यावर Elsaच्या सूचनेप्रमाणे आम्ही आमचे बूट काढून एका मोठ्या टाकीत टाकले. Fins दुसऱ्या टाकीत. तसेच goggles एका मोठ्या बादलीत. मग आम्ही आमचे कपडे, टॉवेल घेऊन अंघोळीला गेलो. गरम-गरम पाण्याने अंघोळ केली. कपडे बदलून झाल्यावर Elsaने वेट्सुट आमच्याकडून घेऊन मोठ्या टाकीत टाकला. मग आम्ही तिथेच बाकड्यावर बसलो. खूप थकायला झाले होते. मायकलने आम्हाला गरम कॉफी आणि गरमागरम Croissant दिला खायला. खूपच गरम आणि चविष्ट होता.

Croissant हा युरोपियन देशात मिळणारा पावाचा प्रकार आहे. साधा Croissant लांबट व थोड्या वाकडा (C या अक्षरासारखा) असून त्याचे वरचे कव्हर एकदम खरपूस आणि खुसखुशीत असते व आतमध्ये नरम पापुद्रे असतात. वरच्या भागावर Hazelnutचा जाडसर चुरा आणि तिळ लावलेले असतात. हा गव्हाच्या पिठाचा बनवतात व फ्रेश असेल तर खूप छान लागतो. कॉफी पिऊन झाल्यावर मितालीने आमचा चौघांचा सेल्फी घेतला. नॅनोचा फोटो घेतला. साधारण पावणे चारला आम्ही तिथून निघालो. आमची परत जाण्यासाठी बस 06:40 ला होती. मग आम्ही त्या परिसरात फिरण्याचे ठरवले.


प्रचंड मोठ्या मोठ्या बोटी तिथे होत्या. काही बोटींची डागडुजी चालली होती. तिथे हा खूप मोठा व्यवसाय आहे. बोटींचे सर्विसिंग करणाऱ्या कंपन्या आहेत. अशा बोटी भाड्याने देण्याचा देखील व्यवसाय आहे. काही बोटीत छोट्या, तर काही अवाढव्य, राजेशाही आणि देखण्या होत्या. चालत चालत पलीकडच्या किनार्यावर गेलो. तिथे एका famous बेकरीत आम्ही almond केक आणि Croissant घेतले. मितालीने पैसे दिले आणि सांगितले की केक आम्ही इथेच बसून खाऊ. त्यावर आम्हाला समजले की पार्सल असेल तर कमी पैसे लागतात व तिथे बसून खायचे असेल तर थोडे जास्त पैसे लागतात (service charge added). मग आम्ही पार्सल घेतले आणि समोरच्या बाजूला झाडाखाली बाकावर बसून केक खाल्ला. अतिशय रुचकर होता केक! पाणी पिऊन आम्ही परत दुसर्या किनार्याला जायला निघालो.

या किनार्यावर मासेमारीचे मोठे-मोठे ट्रॉलर्स होते. तसेच खूप सारे seagulls कर्कश्श आवाजात ओरडत होते. ट्रॉलर्समध्ये मोठे मासे पकडून ठेवले होते व seagulls या ट्रॉलर्सला चोची मारून मासे खाण्याचा प्रयत्न करत होते. कर्मचारी एका यंत्राच्या सहाय्याने त्यातले मासे काढून ते बर्फाच्या ट्रेमध्ये vansमधून विक्रीसाठी पाठवत होते. आता सहा वाजत आले होते. 06:15पर्यंत आम्ही बसस्टॉपवर आलो. 06:40च्या बसणे अंडरग्राउंड बस स्टेशन व तिथून पुढे सिटी बसणे होस्टेलवर परतलो. साधारण आठ वाजले होते रात्रीचे. अशाप्रकारे आमची Mallorca ट्रिप पूर्ण झाली!











Leave a Reply