
29 April
आज आम्ही Czech Republic देशातल्या Prague या शहरात फिरणार होतो. मिताली या आधी तिथे तीन-चार वेळा जाऊन आली आहे. आजचा प्रवास साडेचार ते पाच तासांचा अजून बसचा होता. आम्ही सकाळी सहा वाजता उठलो. सगळे आवरून साडेसातला निघायचे ठरले होते. पण आम्हाला निघायला काही मिनिटे उशीर झाला. आम्ही प्लॅटफॉर्मला पोहोचलो आणि आमच्या डोळ्यासमोरुन ट्रेन निघाली- अगदी वेळेनुसार! मितालीने परत timetable बघून सांगितलं की काळजी करू नकोस आता आपली दुसरी ट्रेन वीस मिनिटांनी आहे. बर्लिनहून प्रागसाठी बस नऊ वाजता होती. जर आधीची ट्रेन चुकली नसती तर आम्हाला बससाठी buffer time मिळाला असता पण आता वीस मिनिटे लेट झाल्यावर बससाठी जरा धावपळ करावी लागणार होती. आमचे दैव बलवत्तर म्हणून आम्ही 08:50ला बस स्टँड वर पोहोचलो. बस उभीच होती. एकदम मस्त बस! पाच ते सहा पायऱ्या होत्या बस मध्ये चढल्यावर. पहिल्या पायरीवर उजव्या हाताला W.C. होते. तिन्ही बाजूने आधारासाठी rods होते. साधारण पाच तासाचा प्रवास आणि घरून दोन तास अगोदर निघाल्याने W.C.ला भेट देणे अनिवार्य होते. त्या छोट्याश्या जागेत जाता-येताना बरीच कसरत करावी लागली, कारण बस चालू असताना येणारी वळणे तसेच W.C.चे दार उघडायचे असेल तर एकदम शेवटच्या पायरीवर उतरल्यावर मग ते दार उघडून आत जाता येणार होतं. एकंदरीत अवघड मामला होता!

या प्रवासात आमच्या रांगेत बाजूच्या सीटवर एक मुलगा बसला होता. आमच्या गप्पा, खाणे इ. चालू असताना तो मुलगा बस सुरु झाल्यापासून बसमधून उतरेपर्यंत काहीतरी पेपरवर लिहीत बसला होता. अजिबात इकडे तिकडे न बघता! या प्रवासासाठी आम्ही पालक पुर्या आणि दुपारच्या जेवणासाठी पोळ्या व उकडलेल्या बटाट्याची भाजी बरोबर घेतली होती. तसेच दुधाची छोटी प्लास्टिक डबी, चहा, साखर, कॉफी पावडरचे रेडीमिक्स असे सर्व घेतले होते. हे सर्व माझ्यासाठी अगदी कौतुकास्पदच होते! मितालीचे सर्व प्लॅनिंग एकदम झकास! प्लॅन A/B/C तयार!

आम्ही हॉटेलवर पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. आम्ही फ्रेश होऊन जेवण केले. मितालीने पोळी-भाजी गरम करून आणली, तसेच बरोबर गरम गरम चहा! या सर्वाचा आस्वाद घेऊन आमचं सर्व सामान लॉकरमध्ये ठेवून आम्ही फिरायला बाहेर पडलो. त्या दिवशी आम्ही जरा आजूबाजूला फिरलो. तिथली खासियत, Chimney cake खाल्ला. केकचे घट्ट पीठ बांबूला गुंडाळून चुलीवर भाजतात; भाजल्यानंतर आतला बांबू बाहेर काढल्यामुळे जो पोकळ भाग असतो त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ भरून मग खायचा. उदाहरणार्थ, चॉकलेट, वेगवेगळ्या चवीचे आईस्क्रीम इ. खूप छान, खरपूस आणि गोडसर! सगळीकडे पर्यटकांची गर्दी. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळ्या चवीचा आणि रंगाचा Chimney cake. एकंदरीतच युरोपमध्ये सगळीकडे बियरचे प्रमाण खूप आहे. प्रागमध्ये बियरला Pivo (पिवो) असे म्हणतात. थंडी संपत असल्याने रेस्टॉरंटच्या बाहेर टेबल-खुर्च्या ठेवून बसायची व्यवस्था असते. काही ठिकाणी बाजूला काचेचे पार्टिशन आणि वरती मोकळे असे पण होते. तिन्ही त्रिकाळ गर्दीच गर्दी आणि गर्दीचा एकच चेहरा तो म्हणजे बियर! बियर बरोबर french fries, onion rings, fried cheese खातात.


नंतर आम्ही Petrin टॉवर बघायला गेलो. तिथून वरती जाण्यासाठी छोटी ट्रेन होती. त्या ट्रेन स्टेशनचं नाव Ujezd (उजेड) असे होते. तेथून ते Petrin टॉवरपर्यंतचे अंतर 60 मीटर होते. Petrin स्टेशनला उतरल्यावर तिथे समोरच Astronomy observatory होती. आजूबाजूला मोठी बाग, वेगवेगळ्या रंगांची फुलं, झाडं बघून डोळ्याचे पारणे फिटले. जरा पुढे गेल्यावर उंच मनोरा होता. त्याची रचना Parisमधल्या आयफेल टॉवरसारखी आहे. हा मनोरा 1961साली Petrin डोंगरावर बांधला होता. हा मनोरा काही वर्ष दुरुस्तीसाठी आणि मजबुतीकरणासाठी बंद होता. 1979मध्ये हा परत खुला केला गेला. याची उंची आयफेल टॉवरपेक्षा पाचपट कमी असून 63 मीटर इतकी आहे. या मनोर्याला 299 पायऱ्या आहेत. तिथे वर जाण्यासाठी लिफ्टची पण सोय आहे.दोन्हीसाठी तिकीट आहे. लिफ्ट तिकीट जास्त होते म्हणून मितालीने फक्त माझं लिफ्टचं आणि तिचं पायर्यांनी चढून जाण्याचं अशी दोन वेगवेगळी तिकीटे काढली. Lift operatorला तिकीट दाखवल्यावरसुद्धा तिने आम्हाला दोघींना लिफ्टने वरती नेले. वरतून पूर्ण Prague शहराचे दर्शन घडते. आम्ही तिथे साधारण अर्धा तास घालवला. खुप फोटो काढले. मग परत लिफ्टने खाली आलो. मग Petrinचा डोंगर आम्ही पायी उतरलो. काही ठिकाणी उतार अतिशय तीव्र होता, पण आम्ही थांबत थांबत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत खाली उतरलो.



आजच्या दिवशी आम्ही वॉकिंग टूरचे बुकिंग केले होते. टूर सुरू होणार होती दहा वाजता. चहा आणि पालक पुरी खाऊन नऊ वाजता आम्ही निघालो. सर्वसाधारणपणे इथे वेगवेगळ्या भाषांमधून सिटी टूर असतात. त्या फ्री असतात. टूर संपल्यावर तुमच्या मर्जीने तुम्ही टूर गाईडला बक्षीस देऊ शकता. समजा स्पॅनिश टूर असेल तर त्या गाईडकडे स्पॅनिश फ्लॅगच्या रंगाची छत्री असते, फ्रेंच भाषेतून असेल तर गाईडची छत्री फ्रान्स फ्लॅगच्या रंगाची. ही टूर दोन तासाची असते.
टूरची सुरुवात Old Town पासून झाली. तिथे प्रथम तेराव्या शतकातले churches पाहिले. त्याकाळात कॅथलिक पंथाचे वर्चस्व होते. ही चर्चेस नॉर्मल लोकांकडून बरेच taxes घ्यायचे. तिथेच चौकात Jan Hus (यान हुस) यांचा भव्य पुतळा आहे. यान हाऊस हा प्रॉटेस्टंट पंथाचा प्रचारक होता. त्याने टॅक्स सिस्टम विरुद्ध आवाज उठवला व जनतेचे चर्च कडून होणारे शोषण थांबवले. त्याकाळात कॅथलिक पंथाचे प्राबल्य असल्याने सर्व राजे-महाराजे कॅथलिक होते. त्यांच्या मनाविरुद्ध वागणाऱ्यास भयंकर कठोर शिक्षा असायच्या. तिथल्या एका उंच खिडकीतून आरोपीला खाली ढकलून दिले जायचे व खाली काटेरी टोकदार भाले असायचे. वरतून पडणारा तो माणूस जिवंत राहण्याची शक्यता शून्य! Defenestration असे या कृत्याचे नाव होते. दुसरी एक पद्धत म्हणजे घोड्यांच्या टापा खाली चिरडून मारणे. Jan Husला defenestrationची शिक्षा दिली होती.

चर्चच्या आजूबाजूला जी घरे आहेत ती तेराव्या शतकाच्या आधीची आहे. अत्यंत कलात्मक रीत्या या इमारती जतन केले आहेत. इमारतीमध्ये माणसे राहण्यासाठी लागणाऱ्या सर्व आधुनिक सुखसोयी आहेत तरीही त्यांचे पुरातनपण अतिशय कौशल्याने जपले आहे. थोडक्यात सांगायचं तर त्यांचं स्ट्रक्चर हे जुने असून रंगरंगोटी केल्यामुळे त्या इमारती अगदी नवीन आणि सुंदर दिसतात.
त्याच चौकात एक खूप जुने Astronomical घड्याळ आहे. त्या काळाच्या समजुतीनुसार पृथ्वी स्थिर आहेतव सूर्य आणि इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात असे मानले जायचे. या घड्याळावर मध्यभागी पृथ्वी असून भोवताली वेगवेगळ्या डायलवर सूर्य, चंद्र व इतर ग्रह त्यांच्या ग्रहस्थितीनुसार आहेत. इतके जुने घड्याळ असून देखील त्याचे mechanism उत्तम आहे! हे घड्याळ दर तासाला ठोके देते. दर तासाला सर्वात वरच्या झरोक्यातला कोंबडा बाहेर येऊन आरवतो. कोंबड्याच्या खालच्या बाजूला दोन मोठे झरोके आहेत. त्यातून समाजातल्या सर्व थरातले लोक- उदाहरणार्थ, जमीनदार, व्यापारी, शेतकरी, सामान्य माणूस असे चेहरे डोकावतात. त्यांच्या खालच्या बाजूला डाव्या हाताला एक सांगाडा हातात भाला घेऊन ठोके पडतील तितक्या वेळा भाला हलवतो. उजव्या हाताला सैतानासदृश्य पुतळा असून तो हातातली पैशाची बॅग वाजवतो.



नंतर आम्ही तिथल्या चौदाव्या शतकातील Charles युनिव्हर्सिटीला भेट दिली. Charles राजाने तिची स्थापना केली होती. प्राग शहरात या युनिव्हर्सिटीचे बरेच कॅम्पस आहेत. आम्ही पाहिलेल्या या युनिव्हर्सिटीच्या इमारतीचा एक ठराविक भाग मूळ स्वरूपात ठेवून, बाकी पूर्ण इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करून वापरायोग्य केली आहे. इथे जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सुद्धा इथे काही काळ शिकवले आहे.
तिथून आम्ही पावडर गेटला गेलो. तिथे दारू साठवण्यासाठी गोडाऊन होती. एकूण तेरा भव्य प्रवेशद्वारे Pragueमध्ये शिरण्यासाठी त्याकाळी असायची पण आता हे एकच गेट सुस्थितीत आहे. बाकीची सर्व प्रवेशद्वारे युद्धामध्ये, आगीमध्ये नष्ट झाली. 11:15 वाजता टूर गाईड Pawel (पावेल) याचा आम्ही निरोप घेतला. मितालीने त्याला टीप देऊन आभार मानले.

आम्हाला राजवाडा बघायला जायचं होतं. तसेच तिथे लंडनच्या बकिंगहॅम पॅलेससारखा Change of guards सोहळा असतो तो सुद्धा बघायचा होता. पॅलेसवर जाण्यासाठी 26 नंबरची tram जाते. आम्ही tram स्टेशन वर येऊन थांबलो. इथे आमचा थोडा directionचा गोंधळ झाल्यामुळे आम्ही विरुद्ध दिशेची tram पकडली. आत शिरल्यावर मितालीच्या लक्षात आले. तोपर्यंत आम्ही 2 stops पुढे गेलो होतो. मग खाली उतरुन विरुद्ध दिशेची tram पकडून जाउया असे ठरवले. शेवटी जवळजवळ पंधरा मिनिटांनी आम्हाला हवी असलेली 26 नंबरची tram आली. Tramचे रंगरूप अत्यंत आकर्षक होते. साधारण पंधरा मिनिटांनी राजवाड्याच्या स्टॉपला आम्ही उतरलो आणि पाहतो तो काय, तिथे भलीमोठी पर्यटकांची लाईन! राजवाड्यात शिरायला! मग आम्ही सुद्धा lineमध्ये उभे राहीलो. शंभर-एक वेगवेगळ्या देशातले लोक तरी नक्कीच असतील या लाईनीत. 12:50ला आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळाला व आम्ही दुपारी एक वाजताचा Change-of-guards सोहळा पाहिला.


पॅलेसच्या मुख्य दरवाज्यापाशी दोन्ही बाजूला प्रत्येकी एक-एक गार्ड तैनात केलेला असतो. एकदम कडक युनिफॉर्म घालून हे दोन्ही गार्डs एकदम attentionमध्ये उभे असतात! दर तासांनी गार्ड बदलतात. या सोहळ्यामध्ये त्यांची जागा घेणारे दुसरे गार्ड त्यांना मिलिट्री खाक्याने सॅल्यूट करून मार्चिंग करत येतात. जे guards उभे असतात ते तासभर एकच पोझिशन मध्ये उभे असतात. नजर एकदम स्थिर, चेहऱ्यावर स्थितप्रज्ञतेचा भाव आणि पुतळ्यासारखे स्थिर. प्रथम दर्शनी मला तर ते पुतळाच वाटले! खरंच आश्चर्यजनक गोष्ट आहे की देश-विदेशातून किती वेगवेगळी माणसे त्यांच्या आजूबाजूने वावरत असतात पण हे गार्डस मात्र ढिम्म उभे असतात.



पॅलेस खूपच भव्य आहे. पूर्ण पॅलेस बघण्यासाठी अख्खा दिवस वेळ पाहिजे. आमच्याकडे तेवढा वेळ नसल्याने पॅलेस आतून बघण्यासाठी तिकीट होते ते आम्ही घेतले नाही पण पॅलेसच्या आजूबाजूच्या बागा आणि आसपासचा सर्व परिसर फिरून बघितला. तिथेच एक खूप जुने चर्च आहे. त्या चर्चची डागडुजीची सुरुवात 1260मध्ये झाली. सर्व दुरुस्ती व रंगकाम पूर्ण होण्यास 1930 साल उजाडले. एकूण 600 वर्ष लागली! कारणे अनेक होती- कधी राजा बदलला, कधी निधी कमी पडला, कधी मतभेदांमुळे.. जवळ जवळ तास-दीड तास आम्ही तो पूर्ण परिसर फिरलो. तिथे बाहेर पडण्याच्या मार्गावर observation points होते. तिथून खालील सर्व शहराचे दर्शन होते. आणि हो, आम्ही युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांमधून trams, बस इ. प्रवास केला पण आम्हाला कुठेच स्पीडब्रेकर दिसला नाही! खरोखर नवलच.



















Leave a Reply