मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!
काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे. पण ती series पाहताना लक्षात येते की माणसाच्या जिवापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे आहे. आपण अमर नाही हे प्रत्येकाला माहीत असून देखील जे राजकारण खेळले जाते, ते अगदी विखारी आहे. दुसरी गोष्ट देशप्रेमाबद्दल- माझ्या मते आपल्याकडे जे देशप्रेमी होऊन गेले ते एकमेवाद्वितीयच पण असे अजिबात नाही. प्रत्यक्ष मरण दिसत असूनही, परत ते मरण अत्यंत वेदनादायी, कुठल्याच वेदनाशामक औषधांना दाद न देणारे असून ते स्विकारणारे तीन रशियन मला आपल्या भगतसिंग राजगुरू एवढेच आदरणीय वाटले.

Chernobyl seriesची घटना एप्रिल 1986 मधल्या अणूभट्टी विस्फोटावर आधारित आहे. छोट्या छोट्या चुका एकत्र येऊन किती भीषण आणि भयावह घटनाघडू शकते याचे उत्तम उदाहरण. सुरुवात होते ती प्रमोशन आणि इन्क्रिमेंटच्या लोभाने safety norms 12 पैकी 11 मध्ये पास, फक्त एकच सुरक्षा तपासणी तीन वेळा करून तिन्ही वेळा अनसक्सेसफुल! तेव्हा वरच्या officersना घाई झालेली की ही एकच तपासणी करून टाकूया पटकन ज्यामुळे आपले प्रमोशन, इन्क्रिमेंट व गुडविल सगळेच होऊन जाईल. त्या तिघांपैकी दोन जण तर घरीच असतात व एक supervisor कामावर असतो. तो short-tempered असल्याने ओरडा-आरडा करून हाताखालच्याना चुकीच्या steps घेण्यास भाग पाडतो. अर्थात अणूभट्टी स्फोट होऊ शकतो असे कुणाच्याही ध्यानीमनी पण नसते कारण तोपर्यंतच्या पुस्तकांमध्ये तसा उल्लेख पण नसतो. त्यामुळे ती परिस्थिती सर्वांसाठीच नवीन असते.


Radiation explosion झाल्यावर काय करायचे हे पण कोणाला माहित नसल्याने ती अणूभट्टी डिझाईन केलेल्या expert scientist Mr. Legasov यांना Moscow वरून बोलवतात, ते स्फोट झाल्यावर 20 तासांनी. तो एका गव्हर्मेंट ऑफिशियलबरोबर हेलिकॉप्टरने पाहणी करतो तेव्हा तो सांगतो की हे जे काय घडले आहे ते महा विध्वंसक आहे, यातून दर तासाला कित्येक पट रेडिएशन सतत उत्सर्जित होत राहणार आहे तेव्हा लवकरात लवकर आजूबाजूच्या 200 ते 300 km परिसरातल्या सर्व लोकांना सुरक्षित जागी हलवा. याआधी सायंटिस्ट येईपर्यंत radiation radiationची आग कशी विझवायची याची कोणालाच माहिती नसल्याने, fire brigadeच्या लोकांना मध्यरात्री बोलवून त्यावर पाण्याचा मारा करायला सांगितले. त्या लोकांना पण अणूस्फोट म्हणजे काय हे माहीत नसल्याने ते लोक coreच्या अगदी जवळ जाऊन पाण्याचा मारा करतात. ही सर्वस्वी चुकीची पायरी होती. जे ग्राफाईटचे तुकडे आसपास पडले असतात त्यातील एक तुकडा एक firefighter हातात काही मिनिटांसाठी कुतूहल म्हणून उचलतो.



पण 15-20 मिनिटात त्या माणसाचे हात लाल लाल होतात आणि skin भाजून आतमध्ये पर्यंत जखमा होतात. कारण तो प्रत्येक ग्रॅफाइटचा तुकडा हा रेडिएशनने भरलेला जणू एक बॉम्ब असतो. अग्निशमन दलाचे सर्व लोक तीन-चार दिवसातच असह्य वेदनांनी मरण पावतात. त्या कॉलनी मधले कित्येक जण लागलेली आग बघायला मुलांना घेऊन तिथे गंमत म्हणून उभे राहतात. तेव्हा highest रेडिएशन उत्सर्जित होत असते. ही सर्व माणसे, मुले, बायका सर्व पुढे मृत्यू पावतात. तिथे आतमध्ये काम करणारा scientist, जेमतेम पंचवीस वर्षाचा, supervisor सांगतोय ते चुकीचे आहे व मला याची काहीच माहिती नाही असे सांगतो तरी त्याला व त्याच्या सीनियरला supervisor ते नाही म्हणत असताना, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन तसेच पूर्ण रशियामध्ये तुम्हाला कुठेच नोकरी मिळणार नाही याची काळजी मी घेईन असे सांगून जिथे स्फोट झाला आहे तिथे आग विझवण्यासाठी पाणी टाकण्याची ऑर्डर देतो.

जेव्हा Legasov तिथली परिस्थिती बघून boron आणि sand जर coreवर टाकले तर तो core ज्याचे तपमान 2000 डिग्री सेंटीग्रेड असते त्याचा lava होण्यास मदत होईल असे सांगतो. पण नंतर त्याला समजते की आगीमध्ये आधीच भरपूर पाणी ओतले आहे. हे सर्व करण्याआधी पाणी drain करायला पाहिजे आणि valve हाताने उघडला पाहिजे कारण ऑटोमॅटिक valve उघडण्याची यंत्रणा बंद पडली आहे. त्या valveची ज्यांना माहिती आहे अशा सर्वांना, साधारण आठ ते दहा जणांना, बोलवून प्रथम त्यांना- जो हे काम करेल त्याला 400 रुबल्स प्रमोशन मिळेल, असे सांगतात तेव्हा त्यातला एक जण विचारतो की चारशे रुबल्ससाठी जीवावर कोण उदार होईल? तेव्हा त्यांचा ऑफिसर त्यांना सांगतो की हे करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचणार आहेत. तेव्हा त्यातले तिघे workers आपण होऊन उठून काम करण्याची तयारी दाखवतात.

यानंतर Legasovच्या लक्षात येते की boron आणि sand टाकल्यावर lava बनेल आणि तो जर जमिनीत जिरला तर भूगर्भातील सर्व पाणी दूषित करेल. मग त्यासाठी उपाय काय तर जिथे स्फोट झाला आहे त्याच्याखाली बारा मीटर खोल खड्डा खणून तिथे लिक्विड नायट्रोजन टाकून तो लावा थंड झाल्यावर घट्ट होऊन जमिनीपर्यंत पोहोचणार नाही. जमिनीखाली हा सुरुंग खणण्याआधी वरती छतावर आणि आजूबाजूला जे graphiteचे तुकडे उडाले आहेत ते coreमध्ये टाकले पाहिजेत, जर ते उघड्यावर राहिले तर सतत किरणोत्सर्जन करत राहणार. त्यासाठी त्यांना परत माणसांची गरज पडते. मग ते मिलिटरीच्या लोकांना बोलावून त्यांना कम्प्लीट आणि जास्तीत जास्त lead प्रोटेक्शन देऊन त्यांच्या बॅचेसना strict ऑर्डरs देतात की एका माणसाने 90 सेकंदात जेवढे काम होईल तेवढेच करून मागे परत यायचे. अशाप्रकारे अठराशे लोकांना batchesमध्ये पाठवून ते छत पूर्ण क्लिअर करतात.

त्यांच्यासमोर एकामागोमाग एक अनेक प्रश्न उपस्थित होतात. आता coreच्या खाली सुरुंग कोण खणणार? त्यासाठी खाण कामगारांना हाताशी धरतात. ते खाण कामगार ज्या नेत्याचे ऐकत असतात त्याला ते सांगतात की सहा आठवड्याच्या आत हा खड्डा करून झाला पाहिजे. त्यावर तो नेता पण समजून जातो की आपण याला हातानेच करायला पाहिजे, मशिनरी वापरता येणार नाही किंवा सुरुंग लावता येणार नाही. आत मध्ये 50 डिग्री टेंपरेचर असते, कारण वर बारा मीटरवर ती धगधगणारी अणूभट्टी असते जिचे टेंपरेचर 2000 डिग्री सेंटीग्रेड असते. तेव्हा तो नेता सांगतो कि आम्हाला आत मध्ये पंखे तरी द्या कमीत कमी. त्यावर मंत्री त्यांना सांगतो की पंख्याने धुळ उडेल व तुमच्या नाका-तोंडात जाईल. त्यावर तो सांगतो की चालेल धुळ गेली तरी, आम्हाला खाणीत काम करायची सवय आहे. त्यावर मंत्री त्याला सांगतो की मी पंखे देत नाहीत यातच तुमची भलाई आहे कारण ही धूळ साधी नाही. तो लीडर स्मार्ट असतो. मग तो लगेच विचारतो की आमचे काही झाले तर सरकार आमच्या फॅमिलीला सांभाळेल का? त्यावर त्याला उत्तर मिळते की ते मी सांगू शकत नाही. त्यावर तो नेता पाठ फिरवून परत परत कामावर जातो आणि कमीत कमी कपड्यावर काम करून मग ते लोक तो जॉब पूर्ण करतात. चारशे कामगारांपैकी 100 खाण कामगार वयाच्या 40 वर्षाच्या आतच मरण पावतात. ते तिघेजण व हे कामगार खरोखरचे heroes नाहीतर काय! खरेच salute या सर्वांना!


या सर्वात Soviet Unionचा हा stand होता की हे जर बाकीच्या देशांना कळले तर आपले वर्चस्व कमी होईल. तेव्हा रशिया आणि अमेरिका यामध्ये cold war सुरू होते. त्यामुळे सोवियत युनियनची strategy अशी होती की काही झाले तरी चालेल पण आपले वर्चस्व कमी होता कामा नये. केवळ या विचारांमुळे त्यांनी केजीबीच्या (केजीबी म्हणजे रशियन गुप्तहेर संघटना) मदतीने Legasov सारख्या अनेकांवर लक्ष ठेवले. Legasovवर दडपण आणले की सत्य जगासमोर येता कामा नये. त्याच्यावर खूप बंधने आणली गेली की कोणाशी बोलायचे नाही किंवा पत्रव्यवहार करायचा नाही. तो काम करत होता त्या संस्थे मधले त्याचे अस्तित्व अनुल्लेखाने संपवले गेले- तू यापुढे काही शोध लावला तरी त्याचे श्रेय तुला न मिळता दुसऱ्याच्या नावाने ते प्रसिद्ध होईल. या अशा सर्व प्रसंगामुळे Legasov खूप डिस्टर्ब होतो. अशात त्याला समजते की तो ब्लड कॅन्सरचा शिकार झाला आहे. त्याचे केस गळून पडतात, थुंकीतून रक्त पडते. त्याला कळून चुकते की आपला शेवट जवळ आला आहे.
तेव्हा तो हे सत्य जगासमोर आणायचे ठरवतो. पण हे कसे करणार? कारण केजीबीचा सक्त पहारा असतो. फोन tapped असतो; त्याच्या पत्रव्यवहारावर बारीक लक्ष असते. तेव्हा तो टेपरेकॉर्डर वर एक ऑडिओ कॅसेटवर रेकॉर्डिंग करतो. त्यात तो प्रथम स्वतःची चूक कबूल करतो, की या आधीच मी जगाला सत्य सांगायला हवे होते पण घाबरून मी खोटी साक्ष दिली. तो या casseteमध्ये सर्व खरे खरे सांगतो. नंतर त्याच्या पेट मांजरासाठी तीन-चार दिवसाचे खाणे काढून ठेवून, त्या कॅसेट्स एक recorded आणि बाकी blank, एका पेपरमध्ये पॅक करून कचऱ्याच्या बादलीत ठेवून तो कचरा बाहेर ठेवण्याच्या निमित्ताने आधी ते पाकीट एका सुरक्षित ठिकाणी ठेवून मग बाकी कचरा डस्टबीन मध्ये टाकतो. कारण त्याला माहित होते की तो गेल्यानंतर त्याने टाकलेला कचरा देखील शोधतील. या प्रकारानंतर तो लगेचच घरी येऊन स्वतःला fanला टांगून आत्महत्या करतो. त्याच्या मृत्यूनंतर हे सत्य साधारण चार ते पाच वर्षांनी जगासमोर येते. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी association हे जगासमोर आणते.
हे सत्य उघडकीस आल्यानंतर Legasovने ज्या दुरुस्त्या सुचवलेल्या असतात त्या सुधारल्या जातात, जेणेकरून अशी जबरदस्त हानी आणि असा संहार परत होणार नाही. हे सर्व बघितल्यावर अंगावर अक्षरशः शहारे येतात. त्यांचे यातनादायक मृत्यू बघवत नाही. इतकेच काय तर काही प्रसंग बघितल्यावर डोळ्यातील अश्रू थांबतच नाहीत. माहित असते की हे फक्त डॉक्युमेंटेशन आहे, हे सर्व घडून गेलेले आहे, हा इतिहास आहे.

एक आजी, जी 88 वर्षाची आहे, तिला तिच्या घरातून काढण्यासाठी पोलिस ऑफिसर येतात. तेव्हा ती गाईचे दूध काढत असते. ती या सर्वाला तयार नसते. तिचे म्हणणे असे की या सर्वाचा अनुभव मी घेतला आहे. मी पहिले-दुसरे महायुद्ध पचवले आहे. तेव्हा पण मी हे सर्व सोडून गेले नाही. तेव्हा आता पण मी ही जागा सोडणार नाही. ही परिस्थिती तिच्या आकलनापलीकडील असते. तेव्हा नाईलाजाने पोलिस ऑफिसर घरातील सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू बाहेर टाकतात. इतकेच काय तर तिने नुकतेच काढलेले गाईचे दूध टाकून देतात. त्यावर ती आजी रिकामी बादली घेऊन परत दूध काढायला बसते आणि काही न बोलता त्यांना दाखवून देते कि काही झाले तरी मी येणारच नाही. शेवटचा उपाय म्हणून तो ऑफिसर गाईला गोळी मारतो आणि मग आजीला घेऊन जातो. आपल्याला त्या वेळी ते ऑफिसरचे क्रौर्य दिसते पण प्रत्यक्षात तेच योग्य होते कारण या उच्च किरणोत्सर्जित वातावरणात कुठलाही प्राणी अथवा माणूस जिवंत राहू शकणार नाही आणि त्यांचा मृत्यू हा वेदनेने तळमळत होणार म्हणून त्या गाईला गोळी मारणे हाच उपाय, तिला वेदनेने तळमळत मग काही दिवसांनी मरण येण्यापेक्षा उपकारक होता.

या सर्वात पक्षी तर आपोआप उडता उडता मरुन पडत होते पण जे प्राणी जिवंत होते त्यांना तिथून हलवायचे नाही तर जागीच गोळ्या घालायच्या अशी ऑर्डर होती. तेव्हा मेंढ्या, कोंबड्या, गाई, कुत्रे जे सर्व आडोश्याला लपून बसले होते त्यांना शोधून काढून गोळीने टिपणे यासाठी मिलिटरीचे लोक appoint केले गेले होते. त्यात काही सिव्हिलियन्स पण भरती केले होते, नॅशनल इमर्जन्सी म्हणून. त्यातला एक मुलगा जस्ट कॉलेजमधून बाहेर पडलेला, जेमतेम 15-20 वर्षाचा, ज्याला या सगळ्यांमध्ये सामील केले गेले होते. त्याला बंदुकी मध्ये बार कसा भरायचा हे देखील ठाऊक नाही. तेव्हा त्याच्या बरोबरचा आर्मी ऑफिसर त्याला, as a गॉडफादर, स्वतःबरोबर घेऊन शिकवतो आणि त्याला सांगतो की प्राण्यांना गोळी घेतल्यावर ते तडफडणार नाहीत याची काळजी घे, ते मरेपर्यंत त्यांना गोळ्या घाल, कारण त्या मुक्या प्राण्यांना लगेच मृत्यू येणे हेच त्यांच्यावर उपकार आहेत. आधीच माणसांमुळे त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे तेव्हा त्यांचा मृत्यू कमीत कमी यातनामय होईल असे बघ. तेव्हा त्या मुलाचे, प्रथम प्राणी दिसल्यावर त्याला तिथून हुसकावण्याचा प्रयत्न, व नंतर कशी तरी एक गोळी मारल्यावर त्याचा अश्रूंचा बांध फुटणे व त्या तडफडणाऱ्या प्राण्याकडे हतबुद्ध नजरेने बघत राहणे, आणि मग नंतर आर्मी ऑफिसरचे मागून येऊन अजून एक गोळी मारून त्या जनावरांची तडफड शांत करणे हे असे अनेक प्रसंग.
एका प्रसंगात एक कुत्र्यांच्या पिल्लांची आई आणि तिची तीन चार पिल्ले खाण्यासाठी भांडत असतात आणि सर्व वस्ती निर्मनुष्य असल्याने त्यांना खायला कोण देणार? तेव्हा मरून पडलेला कोंबडा खाण्यासाठी त्यांची झटापट चालू असताना हा मुलगा तिथे येतो. त्याच्या चाहुलीने ती पिल्लांची आई सावध होते आणि काय नसते त्या नजरेमध्ये? प्राणाची भिक, माझ्या पिल्लांना तरी मारू नकोस हे आर्जव की अजून काही! त्या मुलाचा एकदम पुतळा होतो. त्याला काहीच सुचत नाही. तो रडत रडत तिकडे बघत बसतो. तेव्हा पाठीमागून आर्मी ऑफिसर येऊन त्याला जवळ घेऊन सांगतो की तू बाहेर जा, मी करतो हे सर्व आणि मग तो मुलगा सुन्न चेहरा घेऊन बाहेर आलेला आणि मग गोळ्यांचे आवाज…


एक प्रसंग. अग्निशमन दलाचा ऑफिसर, कि जो खूप एक्स्पोजर मुळे पूर्ण भाजला आहे, त्याची बायको, जी दोन-तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे, तिला जेव्हा कळते की आपला नवरा सिरीयस आहे तेव्हा तिला वाटते की आगीमुळे नवरा भाजला आहे. त्यामुळे वेड्यासारखी ती त्याला भेटण्यासाठी शोधत राहते. एका नर्सला सांगते की मी त्याला भेटण्यासाठी आले आहे, मला एकदा तरी त्याला भेटू द्या. त्यावर नर्स तिला विचारते- तू प्रेग्नेंट नाही आहेस ना? त्यावर काहीच माहित नसलेली ती तरुणी नाही सांगते. कारण ती आणि तिचा नवरा याबद्दल अगदीच अनभिज्ञ असतात. तेव्हा ती नर्स- ठीक आहे फक्त अर्धा तास तू त्याला भेटू शकतेस असे सांगते. ती जेव्हा आत जाते तेव्हा तिथे fire brigadeचे चार-पाच जण (जे अजून खूप सिरीयस नसतात) पत्ते खेळत बसलेले असतात. तिला पाहून तिचा नवरा खूप आनंदित होतो आणि तिला एकदम मिठी मारतो. तेव्हा ती पण आनंदाने त्याला मिठीत घेऊन सांगते की तू लवकर बरा हो, तू आता बाबा होणार आहेस. त्यानंतर एक-दोन दिवसात तो serious होतो व त्याला मॉस्कोच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करतात. तेव्हा ती तरुणी हिकमतीने तिकडे देखील प्रवेश मिळवते आणि सतत त्याच्या बरोबर राहायचा प्रयत्न करते. तिच्या त्या अवस्थेतला अभिनय उत्कृष्ट. असे कितीतरी प्रसंग की डोळ्यातले पाणी थांबतच नाही आणि त्यानंतर मन अगदी सुन्न होऊन जाते.

याक्षणी मी स्वतःला खूप नशीबवान समजते, की खरेच काय अवस्था झाली असेल त्या लोकांची! त्या सुमारास त्या तरुणीच्या जवळपास माझे वय होते आणि मी त्या तरुणी बद्दल अतीव अनुकंपेबरोबर देवाचे आभार मानले, की मी किती भाग्यवान, की माझे सर्व व्यवस्थित पार पडले, माझी मुलगी healthy जन्माला आली. हे ईश्वरा, खरेच तू मला आयुष्यात खूप काही दिले पण मला ते त्यावेळी कळलेच नाही. कदाचित मी तुला दोष पण दिला असेल पण नंतरच्या आयुष्यातले जे थोडे फार वाईट दिवस होते ते पण खूप चांगले होते असे म्हणण्याची वेळ ही सिरीज बघितल्यावर आली आहे. जेव्हा Chernobyl घडले तेव्हा तर मी खूप खूप आनंदात होते कारण माझ्या पहिल्याच मुलीचा जन्म झाला होता. देवाने माझ्यावर जे अनेक उपकार केले त्यापैकी एक. तेव्हा या प्रसंगाची ग्रॅव्हिटी मला जास्त प्रमाणात जाणवली नाही कारण तेव्हा पेपर, रेडिओ हेच कम्युनिकेशनचे मुख्य स्त्रोत होते .माझी डिलिव्हरी झाल्यावर काही दिवस पेपर वाचण्यावर बंदी, तसेच रेडिओवर गाण्यांशिवाय बातम्या ऐकण्यात मला विशेष रस नसायचा. अनेकदा Chernobyl हे नाव कानावरून गेले पण त्याची ग्रॅव्हिटी मला आता कळते. परत एकदा ईश्वराचे अनेक आभार, की त्यांनी मला सुदृढ आणि निरोगी आयुष्य तर दिलेच पण माझ्या दोन्ही मुलींना पण निरामय आयुष्य दिले, थोड्या कमी प्रमाणात का होईना पण मकरंदलापण निरोगी आयुष्य दिले. असो. Series संपल्यानंतर आम्ही दोघी खूप मानसिक ताणाखाली होतो, तेवढ्यात मधुश्रीचा फोन आला आणि खूप बरे वाटले.








Leave a Reply