Zugspitze (13 April)

सकाळी सर्व आवरून आम्ही ट्रेनने Garmisch या स्टेशनला आलो. तिथे रेल्वेच्या locker रूममध्ये सर्व सामान ठेवले व मोजके सामान, म्हणजे एक छोटीशी bag- त्याच्यामध्ये पाण्याची बाटली आणि माझी पर्स, एवढेच घेऊन आम्ही टॉय ट्रेनने Lake Eibsee या पॉइंट पर्यंत आलो. तिथे cable carचा पॉइंट होता.

The Zugspitze– जर्मनीतील सर्वात उंच ठिकाण! याची उंची 2960 मीटर्स एवढी आहे. इकडे आजूबाजूला आल्प्सच्या पर्वतरांगा आहेत. काही पर्वत हिरवेगार तर काही बर्फाच्छादित. टॉय ट्रेनचा शेवटचा stop ग्लेशियरपर्यंत व त्याच्यापुढे केबल car. Glacierच्या भागात अनेक लोक skiing करतात. केबल कारमध्ये एका ट्रिपला साधारण पन्नास ते सत्तर माणसे असतात. केबल कारमध्ये एका कॉर्नरला बेंच असतो, बाकी तिन्ही ठिकाणी धरण्यासाठी स्टीलचे मजबूत rods असतात. केबल कार मधून हळूहळू वरती जाताना पहिल्यांदा सर्व लहान-लहान दिसायला लागते. मग ग्लेशिअर्स दिसायला लागतात आणि मग मात्र केबल कारचा वेग वाढतो. साधारण दहा मिनिटात आपण जवळजवळ तीन हजार मीटर उंच पोचतो.

तिथे बाहेर पडल्यावर souvenir शॉप होते. तिथे मॅग्नेट, scarfs, caps, टीशर्ट अशा अनेक वस्तू होत्या. सर्वांवर Zugspitzeचा शिक्का होता. पण सगळ्या वस्तु प्रचंड महाग! साधे मॅग्नेट पण दहा युरो! Cap 25 युरो, टीशर्ट 70 युरो. त्यामुळे तिथे आम्ही काहीच घेतले नाही, फक्त तिथली आठवण म्हणून दोन पोस्टकार्डs घेतली आणि मग अजून वरती गेलो. तिथे चारही बाजूला ऑब्झर्वेशन पॉईंटs होते. अनेक माणसे, मुले इकडे तिकडे फिरत होती. अनेकांबरोबर कुत्रेपण होते. तिथे काळ्या रंगाचे पक्षी होते. अनेक लहान मुले त्यांना हातावर कसल्यातरी बिया घेऊन खायला देत होते. त्या बिया पाहून ते पक्षी हातावरून, म्हणजे खालपर्यंत येऊन, त्या बिया घेऊन परत स्लो-मोशनमध्ये उडत होते. त्या पक्षांना स्लो-मोशनमध्ये उडतांना बघून खूप मजा वाटत होती आणि हसायला पण येत होते.

एके ठिकाणी बर्फाचा साधारण 12 ते 15 फूट उंचीचा डोंगर तयार केला होता. त्यावर लहान मुले, तरुण मुले आणि कुत्रेपण उंचावर चढून आनंद घेत होते. जे लोक बर्फावर चढत होते त्यांचे बूट बर्फावर चढण्यास योग्य असे होते. आमच्या बुटाचा सोल रबरी असल्याने मितालीला पण चढणे शक्य नव्हते. मग मी त्या बर्फाच्या डोंगराच्या बाजूला उभी राहिली आणि मितालीने माझा फोटो घेतला.

या पर्वतरांगांमधून जर्मनी-ऑस्ट्रिया बॉर्डर कनेक्टेड आहे, त्यामुळे आम्हाला एका बाजूने छोटीशी लाईन पार केल्यावर पलीकडे Austrian शॉप्स पण दिसली. तिथे इतक्या वरती German आणि Austrian साईडला एक-एक रेस्टॉरंट पण आहे. तिथे आलेले कुत्रे प्रशिक्षित असल्याने त्यांचे मालक त्यांना ऑर्डर देऊन त्या प्रमाणे फोटो काढत होते. काळे पक्षी अगदी स्लो-मोशनमध्ये उडत होते- अगदी स्वर्गाला हात टेकले असे म्हणतात ते इथे येऊन प्रत्यक्षात उतरल्यासारखेच झाले. परत एवढे करून इतके उत्साही वातावरण होते की बस! आम्ही दोन एक तास वेळ घालवला असेल, पण ते दोन तास कसे गेले ते कळले पण नाही. ऑस्ट्रिया साईडला जाऊन तिकडील सर्व भाग बघून आलो. ठराविक अंतरावर दुर्बिणी बसवल्या होत्या. साधारण सात-आठ फुटावर एक याप्रमाणे. दुर्बिणीतून पाहिले की त्या बाजूला आल्प्सचा जो पर्वत तिकडे असेल त्याचे नाव दिसायचे. दुर्बिण डावीकडे-उजवीकडे फिरवली की तिकडच्या पर्वतांची नावे दिसायची.

Zugspitze वरती Austria-Germany border

सगळीकडे नजर फिरवली तरी बर्फच बर्फ आणि ढग तर इतके सुंदर दिसत होते की विचारता सोय नाही! मधूनच सूर्याची किरणे ज्या बाजूने होती तिथले डोंगर, त्यावरील बर्फ आणि ढग आणि त्याच्यावर पडणारी सूर्याची किरणे- अतिशय विलोभनीय दृश्य होते ते! असे दृष्य टिपायला आपले डोळेच योग्य आहेत, नाहीतर High-end कॅमेरा पाहिजे. मोबाईल कॅमेराला लिमिटs आहेत. असो. इतके बघून, इतका वेळ घालवून देखील समाधान होतच नव्हते. पण शेवटी पर्याय नव्हता म्हणून थोडे मनाविरुद्धच तिथल्या निसर्गाचा निरोप घेतला. मग आम्ही जिथे आम्हाला सोडले होते तिथे आलो. तिथे केबल कार उभी होती आणि आम्ही तिथुन आम्ही केबल कारचा परतीचा प्रवास सुरू केला.

Lake Eibsee

Cable कार पॉइंटपासून दोन मिनिटात खाली उतरत गेले की हा तलाव दिसतो. या तलावाचा व्यास नऊ किलोमीटर इतका असून अनेक जण याला प्रदक्षिणा घालतात. या तलावाच्या पाण्याचा रंग वेगळाच आहे. तलावांमध्ये छोटे-छोटे बेटासारखे तुकडे आहेत, आठ दहा फुट एवढे. तलावाचे पाणी मध्ये अगदी निळेशार असून कडेला हिरवे-मोरपिशी रंगाचे दिसते. आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असे हे ठिकाण असून हा भाग कधीही न विसरता येण्यासारखा आहे! त्या पर्वत रांगा, तो सूर्याचा लपंडाव, ते पक्षी, ते सर्व बर्फाच्छादित वातावरण, ते वेगवेगळ्या आकाराचे ढग, ते ग्लेशिअर्स, त्यावरून skiing करणारे लोक- की जे वरतून अगदी मुंग्यांसारखे दिसत होते.. हे सर्वच अवर्णनीय! हा प्रवास येतांना आम्ही ट्रेनने केला होता; जाताना आम्ही बसने परत Garmisch स्टेशनला आलो. तिथून lockerमधून आम्ही आमचे सामान घेतले.

रात्री साडेअकराच्या सुमारास इन्सब्रुक स्टेशनला पोचलो. तिथून थोड्या अंतरावर असलेल्या टर्किश रेस्टॉरंटमध्ये सँडविच, फलाफल फ्रांकी, cappuccino आणि ताक असे जेवण घेतले. तिथून दहा मिनिटांवर चालत आमचं Montagu होस्टेल होते.

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply